तुम्ही कधी मनोरम्य संध्याकाळ अनुभवली आहे का ?? प्रत्येकाच्या मनातली रम्य पणाची व्याख्या वेगवेगळी असली तरी काही कल्पनांच्या समावेशाशिवाय संध्याकाळचे वर्णन पूर्ण होऊच शकत नाही …
शेतातून परतणारे शेतकरी दादा आणि त्याची बैलजोडी, पाखरांचे थवे, आकाशातली रांगोळी आणि कुठल्यातरी नदीकाठच्या मंदिरातून येणारे आरतीचे, घंटेचे मधुर आवाज … हेच प्रत्येकाच्या मनात ठसलेले संध्याकाळचे चित्र घेऊन सुधीर मोघ्यांनी एक रम्य चित्र साकारले …
या गाण्याची जन्मकथा खरे तर विलक्षण … कविवर्य गदिमांच्या मृत्युनंतर पुढच्याच वर्षी, त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाला मुंबई दूरदर्शनवरून एक कार्यक्रम सादर केला होता.त्यासाठी बाबूजींच्या घरी जुनी कागदपत्रं पहात असताना, गदिमांच्या हस्ताक्षरातील काही अप्रकाशित गीतं सापडली. काही कारणाने ध्वनीमुद्रित न होता बाजूला राहिलेली.. एक कल्पना आली की बाबुजींकरता केलेली ती गाणी श्रीधरने स्वरबद्ध करायची आणि त्यावरच आधारित कार्यक्रम करायचा.. त्यामध्ये एक सुंदर भूपाळीसारखं गाणं होतं 'जाग रघुनंदना, कोकिळा बोलते"… पण त्या जोडीला एखादं नवं गाणं हवं म्हणून बोलताबोलता चांगली कल्पना सुचली, 'गदिमांचं गाणं भूपाळीसारखं पहाटेचं आहे. जोडीला संध्याकाळ घ्यावी असे ठरले … लगेच श्रीधर फडकेंनी चालीचा एक मुखडा तयार केला आणि सुधीर मोघ्यांनी सुंदर गाणं लिहिलं, ज्याचे शब्द होते "सांज ये गोकुळी, सावळी सावळी"…
"सांज ये गोकुळी" गाण्याचे शब्द, चाल आणि त्यात केलेला सुंदर रूपकांचा वापर कोणालाही मोहित करून जावा असाच आहे …
सांज ये गोकुळी…
सावळी… सावळी…
सावळ्याची जणू साऊली..
संध्याकाळचे इतके सुरेख वर्णन… आहाहा … गोकुळात जणू त्या सावळ्या कान्हाच्या सावली प्रमाणे हलक्या पावलाने येते ती सांजवेळ… धृपदच इतके सुरेख आहे कि पहिल्या ओळीतच आपल्या तोंडून नकळत दाद निघून जाते …
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे
पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी..
गाई परतताना त्यांच्या पायाखालच्या वाटासुद्धा जणू त्या कृष्णाच्या रंगात बुडून जात आहेत … घरी परतणारे पाखरांचे थवे आणि नदीकाठच्या मंदिरातून ऐकू येणारा घंटारव…या सगळ्याशिवाय संध्याकाळची कल्पना सुद्धा अशक्य आहे … हो ना ?
माऊली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वार्यावरी
वाहते बांसरी
अमृताच्या जणू ओंजळी
खर सांगायचं तर या गीताची खरी जादू या कडव्यापासून सुरु होते…
किती सुंदर कल्पना आहे बघा … जणू सांजवेळ हि एक आई असून तिच्या अंधाररूपी पान्ह्याचे सगळी सृष्टी प्राशन करते आहे … वारयावरून वाहत येणारे बासरीचे सूर जणू अमृताच्या ओंजळीच घेऊन येत आहेत … सहज सुरेख आणि तरीही किती प्रासादिक असे हे शब्द आहेत …
शेवटचे कडवे म्हणजे तर या सगळ्या गाभाऱ्यावर कळस चढवून जाते …
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले
चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली…
संध्याकाळी दूरवर दिसणारी काळपट डोंगर-रांग, त्याला काजळाच्या रेषेची उपमा किती सहज दिली आहे…
आणि चांदण्याचं खळं डोहात पडलय हे सांगायला आधार कशाचा ? तर पुन्हा सावळ्या रंगाचा … यालाच प्रतिभा म्हणत असावेत …
चांदण्यांना खळे पडणे याचा अर्थ सुद्धा आजकाल माहित नसतो…त्यामुळे या ओळीला दाद मिळणे दूर, पूर्ण कोरा चेहरा मात्र बघायला मिळतो बहुधा…
आशादिदींनी अगदी सहज पणे घेतलेल्या हरकती ऐकताना कुठेही स्वतंत्ररीत्या जाणवत नाहीत इतक्या त्या गाण्याच्या आत्म्याशी एकरूप होऊन गेल्या आहेत ,… पण तेच गाणं म्हणणाऱ्या गवयाला विचारा … श्रीधर फडकेंनी केलेल्या अतिशय सुंदर गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश करावाच लागेल … पण हे गाणं त्याहूनही विशेष आहे कारण याची स्वतंत्र शैली… श्रीधर फडकेंची बहुतेक गाणी हि बाबूजींच्या प्रभावाखाली असलेली जाणवतात… आणि त्यामुळे नकळत त्यांची तुलना बाबुजींशी होतेच … पण हे गाणं मात्र बरचसं वेगळ, थोडस आधुनिक शैलीने जाणारं …
सुधीर मोघेंच्या शब्दांबद्दल काय बोलावं ? मोजकंच पण नेटक आणि सर्वांगसुंदर लिहिणारा हा कवी थोडासा प्रसिद्धी पासून दूर … पण त्यांनी दिलेली शब्द रत्न निव्वळ अप्रतिम …"जरा विसावू या वळणावर" किंवा "दयाघना, का तुटले चिमणे घरटे" सारखी गाणी निव्वळ अवीट गोडीची …
असे हे नितांत सुंदर अनुभव देणारे गाणे आपल्याला ऐकायला मिळाले म्हणून सुधीर मोघे, श्रीधर फडके आणि आशाताईचे आभार मानावे तेवढे कमीच …
असो, मला भावलेल्या एका गाण्याचं मला जमेल तसं चित्र मांडायचा प्रयत्न केलाय …तुम्हाला आवडेल अशी आशा आहे…
No comments:
Post a Comment