Tuesday, July 21, 2015

स्वातंत्र्यवीर सावरकर… १…


ज्यांचं नुसतं नाव ऐकून एक रसरशीत, धगधगतं यज्ञकुंड पहिल्याचा भास होतो असं तेजपुंज व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीर सावरकर … सावरकरांच्या क्रांतिकारक म्हणून  केलेल्या कामाची प्रसिद्धी सगळीकडेच आहे… पण त्यांच्यामध्ये असलेला अभ्यासू साहित्यिक, प्रतिभा संपन्न कवी आणि मातृभाषेवर प्रेम करणारा एक निस्सीम भक्त आपण बघितलाच नाही …

 दोष आपला नाही… सावरकरांचे विचार आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आवाकाच इतका अफाट आहे कि नुसते क्रांतिकारी सावरकर किंवा समाजसुधारक सावरकर समजून घ्यायला एक जन्म कमी पडावा … आज मात्र मी बोलणार आहे ते महाकवी सावरकरांवर …

महाकवी हि पदवी, ती सुद्धा पु.ल. देशपांडे सारख्या विदुषी ने द्यावी यातच सगळं सामावलं आहे … महाकवी म्हणजे कारखान्यात बनवल्यासारख्या हजारोंनी कविता बनविणारा नव्हे!!  मोजक्याच पण आशयघन आणि प्रतिभा संपन्न कविता करणारे सावरकर आपल्या वेगळेपणाने उठून दिसतात… मातृभाषेवर जीवापाड प्रेम करून, असंख्य नवीन शब्दांची भर घालून तिलाच समृद्ध करण्याचं  भाग्य लाभलेला हा क्रांतिकारक विरळाच … आपल्यातल्या तरी किती जणांना

सावरकर म्हणाल कि पहिले डोळ्यासमोर येतं  ते "ने मजसी ने, परत मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला" हे आर्त काव्य …

सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवलं होतं. टिळक आणि सावरकर, दोघांच्या बुद्धिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. तेथे त्यांनी भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलवणे, असे कार्य हातात घेतले आणि काही काळातच ते उदध्वस्त होण्याची वेळ आली होती.. तशात भारतात, घर मोडकळीला आल्याचा.. दोघं भाऊ पकडले गेल्याचा धक्का होताच. कुटुंबाची वाताहत आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत, हे कळणं... या अवस्थेत सावरकर त्या ब्रायटनच्या किनार्‍यावर बसले होते.
पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच, असं सांगता येत नाही.. हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार.. आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून आपण तडक मातृभूमीस जाऊ शकत नाही. या भावनेतून आलेले हे शब्द..
ने मजसी ने परत मातृभूमीला …

जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक उद्रेक सागरावर करीत आहेत.. ते सागरावर रागावलेले आहेत..

भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू
त‍इं जननी-हृद्‌ विरहशंकितहि झालें ।
परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन ।
त्वरित या परत आणीन

‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस..मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास.. मित्र, मित्राला म्हणतो तसा.. की चल जरा फिरायला जाऊ.. दुसर्‍या देशात..त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात.. माझा विरह तिला होईल की काय ? अशी शंका आली.. पण तू तिला वचन दिलंस.. कि मी सर्वत्र संचार करतो आणि मी त्याला परत आणेन …

विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उदधरणी । मी
‘येईन त्वरे’ कथुन सोडिलें तिजला ।
सागरा, प्राण तळमळला

तुझ्या या वचनावर मी विश्वास ठेवला. तू जगभर.. सगळीकडे आहेस, त्यामुळे जगाचा तुला अनुभव असणार.. हा माझा तुझ्यावरचा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव घेता यावा ही इच्छा.. या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो.. आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो सुद्धा..
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.

शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहू यापुढती ।
दशदिशा तमोमय होती

गुण-सुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

पोपट पिंजर्‍यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा, तसा मी फसलो आहे. तमोमय म्हणजे अंधःकारमय.. मार्ग दिसत नाही असं झालंय.
मी जे शिक्षण घेतले आहे, उदात्त आणि उन्‍नत अंगिकारण्याचा जो प्रयत्‍न केला आहे.. त्याचा जर मातृभूमीसाठी, तेथील सर्वसामान्य आणि पीडित जनतेसाठी जर उपयोग करता आला नाही तर ते सर्व व्यर्थच नाही का ?

ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला…

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही.)

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे

किती सुंदर  विनंती आहे बघा…आई कशीही असली तरी प्रत्येक पुत्राला  तिचीच माया सर्वात प्रिय असते … इथल्या महालांमध्ये माझा  जीव रमत नाही … मला त्या आईच्या कुशीतल्या झोपडीची आठवण येते आहे … मला तिकडेच घेऊन चल…  मातृभूमिशिवाय मला हे राज्य नको, एकवेळ मी वनवास किंवा कारावास पत्करेन, पण ते तिच्या कुशीत ..


तुज सरित्पते, जी सरिता । रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला

 हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती.. हे काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते.…
सावरकर सागराला म्हणत आहेत.. माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतमातेचा मला विरह घडवशील तर.. हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल, अशी मी तुला शपथ घालतो.. मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.


यानंतर आता शेवटचं कडवं आहे. त्यात सावरकरांची आर्त आहे; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला.. गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे.

या फेन-मिषें हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा

 सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत.. तर त्याच्या लाटा तशाच उसळून, फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्याप्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात..

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ।
मज विवासनातें देशी

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणार्‍या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणार्‍या सागरा..

तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबल न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे

विजनवास तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणार्‍या भित्र्या खलपुरूषा, ऐक..
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस…
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू…
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


हे गाणं ऐकताना भावनांच्या आर्त कल्लोळाचा आभास होतो… संस्कृतप्रचुर मराठी भाषा जणू भरजरी पैठणी लेऊन उभी राहिलेल्या कुलवंत स्त्री प्रमाणे वाटते …

सामान्य मर्त्य जीव निराशेच्या क्षणी दैवाला-नशिबाला दोष देत कुढत बसतात … व्यसनाधीन होतात … 
सावरकरांचे सगळे जीवनच अतिशय भव्य… मग त्याला त्यांचा आक्रोश तरी कसां अपवाद असणार ?
म्हणूनच प्रेम काव्य लिहिताना ते अगदी सहज 
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

असे लिहून जातात… 
तुमचे आमचे प्रेम फुले, चंद्र आणि नदीचा किनारा यांच्या आधाराने साकारते … पण सावरकर प्रेम करतात ते सुद्धा किती विराट आणि अफाट ते बघा … तुला १०० जन्म शोधत होतो, शत अर्ति व्यर्थ झाल्या … आणि वाट बघण्यामध्ये मी चक्क शेकडो सूर्यमालिकांच्या दीपमाला विझून गेल्या … 
ज्याची प्रेमाची कल्पना इतकी विराट असेल त्याची प्रतिभा कोणत्या जातकुळीची असेल ?? 

अशाच असामान्य प्रतिभेच्या पोटी अंदमानच्या काळकोठडीत महाकाव्य जन्माला येतं … आणि अशाच व्याकुळतेमध्ये सावरकर मध्ये असलेल्या अथांग सागरालाच आव्हान देतात  आणि  एक अजरामर काव्य लिहून येणाऱ्या किती तरी पिढ्यांना एक अमुल्य ठेवा  देऊन जातात … कदाचित यालाच प्रतिभा म्हणत असावेत… 

या सुंदर शब्दांना मंगेशकर कुटुंबाचा परिस स्पर्श झाला आणि शब्दांच्या वेदनांना सुरांचे अमूर्त कोंदण मिळाले… अशी सुंदर चाल देणे  हृदयनाथ आणि श्रीनिवास खळे  यांना सोडून कोणालाही जमलेच  नसते याची प्रचीती  आपल्याला हे गाणे ऐकताना जागोजागी  येते…  
उषा आणि लताचा एकत्र स्वर ऐकण्याची संधी म्हणजे दुधात केशरच … विशेष करून धृपद गाताना "सागरा" शब्दासाठी केलेली द्विरुक्ती केवळ अप्रतिम …  जशी सागराच्या लाटामागून लाटा याव्यात … 

या महाकवीच्या या सर्वांगसुंदर कलाकृतीने ऐकताना जर आपण भारावून गेलो नाही तरच आश्चर्य …  




Reference : http://www.aathavanitli-gani.com/Song/Sagara_Pran_Talamalala




Friday, April 17, 2015

तरुण आहे रात्र अजूनी …

माझ्या अत्यंत आवडीच्या आणि सुंदर गाण्यांपैकी हे एक गाणं आहे …

हे गाणं ऐकताना मी जादूचे खेळ बघणाऱ्या मुलासारखा होऊन जातो …

कल्पना करा … सुरेश भट नावाच्या एका अवलिया ने एका पोत्यातून सुंदर शब्दांची रत्ने काढावीत … आणि हृदयनाथ नावाच्या (ज्यांनी कोणी हृदयनाथ हे नाव ठेवलंय  त्याला देवाने कानात भविष्य हळूच सांगितले असावे… ) दुसऱ्या अवलियाने सुंदर नक्षीदार रांगोळीच्या कोंदणात अलगद सगळी रत्ने नेउन ठेवावी … आणि त्या प्रभावळीच्या  तेजाने आपण दिपून जात असतानाच कुठून तरी आशाचे सूर जणू सरस्वतीचे रूप घेऊन त्या प्रभावळीत विराजमान व्हावेत … सगळा स्वर्गीयच अनुभव … 


मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ते कुठेतरी प्रवासाला जात असताना … २-३ तास यष्टीच्या बाकावर बसून कंटाळा आलेला… बाहेर मी म्हणणारं ऊन … अशा वेळी टाईमपास साठी मोबाईल वर गाणी लावली ,… अचानक आशाचा सूर कानी पडला आणि दिवसभर उपाशी असलेल्या भिकाऱ्याला अचानक पंचपक्वान्नांच जेवण मिळावे तसं वाटलं…

शृंगार हि हळुवार आणि अतिशय तरल अशी भावना … प्रत्येकाच्या अत्यंत जवळची, … पण आपल्या दुर्दैवाने भारतीय संगीतामध्ये शृंगार गीत हि सगळ्यांनी मिळून वाळीत टाकलेली गोष्ट … त्यामुळे मुळात शृंगार गीत मुळातच खूप दुर्मिळ (आज-कालच्या बिभत्स गाण्यांना मुळात गीताचा दर्जा देणंच जीवावर येतं, शृंगार गीत वगैरे तर खूपच दूरची गोष्ट झाली )…


आणि अशात सुरेश भटांसारखा एक दर्दी अवलिया असं काही लिहून जातो कि थक्क व्हावे … मुळात गझल हा प्रकारच दर्दभरा … त्यात एका शृंगार गीत आणि गझलेच्या स्वरुपात…

हे गाणं ऐकताना आशाचे सूर थेट हृदयाला भिडतात आणि मिटल्या डोळ्यांसमोर एका स्त्रीत्वाची कथा उभी राहते… 
भारतीय संस्कृती मध्ये मुळात स्त्रीला माणूस म्हणून दर्जाच कधी मिळाला नाही …  कपडे कोणते घालायचे हे सुद्धा तिने ठरवायचं नाही, मग शृंगार आणि प्रेम यांचा choice तर केवळ अशक्य … 
म्हणूनच तिची वेदना जेव्हा भटांचे शब्द, हृदयनाथांचे सूर आणि आशाचा स्वर घेऊन समोर येते तेव्हा आपण मंत्रमुग्ध होऊन जातो … 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे


"तरुण आहे रात्र अजुनी ", अरे राजा माझ्या मनातल्या भावना अजूनहि तेवढ्याच तरुण, उत्कट आहेत, हि रात्र सुद्धा किती सुंदर आहे.
रात्रीच्या टिपूर चांदण्यांमध्ये रातराणीच्या सुगंधाच्या साथीने तू जवळ घ्यावेस असे वाटते रे … पण तूच जर पाठ फिरवून निजून गेलास तर मी आपलं मन मांडाव तरी कुठे ??  
म्हणूनच आर्त स्वरात मी विचारते आहे … "एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे"
 
शृंगाराचे उत्कट तरीही संयत वर्णन किती सुंदर रीतीने करता येते….  

"अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे


या  ओळीतला  "हाय " आशाताईंनी असा काही उच्चारला आहे कि आपणही नकळत "हाय " म्हणून जातो …





सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे "


"अरे माझ्या राजा, मीच नाही तर हे चांदणे, ते तारे आणि जी रात्र आपण दोघांनी मिळून सजवायची ती रात्र सुद्धा तुला विचारते आहे… तू असा मिटलास का रे ?"  वाह काय सुंदर शब्द आहेत …. 


आणि नंतर भटांनी इतकी सुंदर शब्दरचना केली आहे …

"बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे "


पहाटेची चाहूल घेऊन येणारा पश्चिमेचा गारवा विचारतोय, रातराणीच्या सुगंधाची लयलूट तू केलीस का रे ?? 
या ओळी गाताना आशाताईंनी आणि हृदयनाथ मंगेशकरांनी अक्षरशः कमाल केली आहे … "पश्चिमेचा गार वारा " हे शब्द इतक्या झपकन वर जातात कि अक्षरशः अंगावर काटा येतो… नुसत्या शब्दांमधून आणि स्वरांमधून "पश्चिमेचा गार वारा" आपल्या पर्यंत हे दोघ असे घेऊन येतात कि आपण रोमांचित होऊन जातो … 

उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे


मिलनाच्या कल्पनेनेच माझ्या हृदय उचंबळून येत आहे आणि तू मात्र असा विरक्त का भासतो आहेस?? 
कवीने किती विचारपूर्वक शब्द दिले आहेत पहा … मनातल्या भावनांना लाटांचे रूपक देताना प्रियकराच्या प्रतिसादाला कोरड्या किनार्याची समर्पक उपमा दिली आहे … लाट किनार्याकडेच धावते आणि त्याच्याच मिठीत तिचा शेवट असतो, हो ना ?
 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला आवडलेले या  गाण्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट कोणते असेल तर रूपकांचा सुंदर वापर… 
कोजागिरीचे चांदणे, तारकांच्या दीपमाला, रातराणीचा सुगंध आणि पश्चिमेचा गार वारा … कोणताही अश्लीलपणा न करता सुद्धा शृंगार गीत कसे करावे याचा क्लास काढावा सुधीर भटांनी … 

बागेश्री रागाचा  इतका सुंदर प्रयोग,  रागाची उत्तररात्रीच्या वातावरणात सहज मिसळून जाणारी साथ...  सगळं काही सुरेख जुळून आलेलं... 

 .कोणताही अश्लील शब्द न वापरता आणि खानदानीपणाचा पदर न सोडता सुद्धा इतकं सुरेख गाणं करता येतं…. पण त्या साठी लागते ती सुरांची-शब्दांची तपश्चर्या, प्रतिभेचा आशीर्वाद आणि कलेशी असलेली प्रामाणिकता … 
म्हणूनच जिथे सामान्य माणसं प्रेमभंग झाला कि दारूत बुडून जातात तिथे भटांसारखा एक मुशाफिर 
"कशा सुगंधी जखमा झाल्यात काळजाला,  केलेत वार ज्याने तो मोगरा असावा" 
असं अफाट लिहून जातात … 
वेदनेचं इतकं सुंदर वर्णन मी तरी नाही वाचलं कधी … 

आज कालच्या "बिडी जलैले जिगर से पिया" आणि "मुन्नी बदनाम हुई" च्या जमान्यात सुधीर भट, हृदयनाथ, लता-आशा, बाबूजी यांच्या प्रतिभेची उंची अजूनच मोठी वाटायला लागते … 



मी जेव्हा कविता वाचली तेव्हा लक्षात आलं  कि मूळ कवितेमधले शेवटचे कडवे रेकोर्डिंग करताना गाळले  होती… सहज कुतूहल म्हणून मी त्याचा पुढे शोध घेतला … 


ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे… 


आधीची कडवी ऐकून मला सुद्धा हे निव्वळ शृंगारगीत आहे असेच वाटत होते… त्यातून स्त्रीत्वाची वेदनाच प्रकट होते … पण शेवटच्या कडव्यांचा अर्थ स्वतः भटांनी सांगितला आहे… 
प्रेयसी व्याकूळ पणे आपल्या प्रियकराला विनवते आहे आणि तो लाडिक पणे, लटक्या रागाने तिच्या कडे मुद्दाम दुर्लक्ष करतो आहे … म्हणून ती विवश होऊन त्याला आर्ततेने सांगते आहे, हे राजसा या सुंदर रात्रीचा आणि माझ्या तारुण्याचा असा अपमान नको करूस … हे सगळ तुझंच आहे, मी सुद्धा तुझीच आहे … तुझा हा लटका राग मी कसा घालवू ते सांग तरी… 


टीप :- 
हे गीत विरह गीत असल्याचा समज पसरवण्यात आला आहे … काही ठिकाणी हे गाणं - एक विधवा आपल्या मृत पतीच्या आठवणीत व्याकूळ होऊन गाते असा उल्लेख आहे … पण हे निव्वळ शृंगार गीतंच आहे … स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी त्याचा खुलासा केला आहे … 
https://www.youtube.com/watch?v=EXrwDBiUyOM


खाली मूळ गाण्याची आणि आरती अंकलीकर यांनी गायलेल्या version ची लिंक देत आहे… 
 https://www.youtube.com/watch?v=Cpig8qy9ASs
 https://www.youtube.com/watch?v=y1j3nP1E6cc


— © चिन्मय जोशी 

Friday, March 13, 2015

गीतरामायण - भाग १ …



गीतरामायण नावाचा एक अविस्मरणीय चमत्कार मराठी मध्ये होऊन गेला …
मुळात रामायण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा… लहानपणी राम-कृष्णाच्या गोष्टी आजी-आजोबांकडून न ऐकलेला जीव सापडणं कठीणच … आणि अशा अजरामर कथेला शब्द आणि सुरांच्या जादुगारांचा परिस-स्पर्श झाला कि गीत-रामायण नावाचे अमृत निघत असते …
हजार वर्षातून अशी एखादीच कलाकृती तयार होत असते कि ज्याच्या अनुभवाने स्वत जगन्नियत्याने सुद्धा मुग्ध होऊन जावे आणि माणूस नावाचे रसायन तयार केल्याबद्दल स्वतःच स्वताची पाठ थोपटून घ्यावी …

गदिमा म्हणाले होते, आम्ही गीतरामायण तयार केलं नाही … ते आमच्याकडून त्याने करून घेतलं आहे … किती नम्र आणि तरी सच्चे शब्द आहेत हे … हे मर्त्य मानवाचं काम असूच शकत नाही … या साठी प्रतिभेचे वरदान आणि दैवतांचे आशीर्वाद असलेच पाहिजेतच … आणि असा हा अवीट गोडीचा ठेवा आम्हाला दिल्याबद्दल आम्ही आमच्या कातडीचे जोडे करून दिले तरी गदिमांचे आणि बाबूजींचे ऋण फिटणार नाहीत… मला ते फेडायचेहि नाहीत … काही कर्ज परतफेडीसाठी नसतातच … आईच दुध आणि सूर्याचे तेज यांचा हिशोब मांडायच्या भानगडीत न पडलेलच बरं , हो ना ??

असो, तर आज-कालच्या यो यो हनी सिंगच्या जमान्यात कदाचित हा लेख अप्रस्तुत वाटेल पण तरी गीतरामायणातील मला आवडलेल्या - भावलेल्या निवडक गाण्यांविषयी मी इथे बोलणार आहे …
प्रतिक्रिया जरूर कळवाव्या …

गीत १ -

कुश लव रामायण गाती …
स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव गाते कोकिल
बालस्वराने करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्‍त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परि तो उभयां नच माहिती



गदिमांच्या प्रतिभेचा आणि कल्पनाशक्तीचा हा पहिला अविष्कार …रामाने सीतेचा त्याग करून बराच काल लोटला आहे…. आता राम सार्वभौम राजा होणार आहे, त्याच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या लोकांमध्ये त्याचेच पुत्र आहेत … कुश-लव वाल्मिकींच्या आज्ञेने तिथे येउन रामचरित्र गाउन दाखवतायत … आणि कुश-लव यांना माहीत नाही कि हा आपलाच पिता आहे, रामालाही हे नातं नाहीत नाही … किती सुंदर योजना केली आहे बघा…

गदिमांना पुलं शब्दांचे जादुगार का म्हणायचे ते इथे समजतं …
कुश-लव यांना गंधर्वाची उपमा देताना "सजीव पुतळे रघुरायाचे" म्हणून किती समर्पक शब्द रचना केली आहे …
पुत्राने पित्याची स्तुती करणे याला  "ज्योतिनें तेजाची आरती" या पेक्षा सुंदर शब्द दुसरे मिळणं शक्यच नाही हे आपल्याला तर पटलं बुवा … बाळांच्या कोवळ्या आवाजाला कोकिळेची किलबिल म्हणताना  त्यांचा निरागसपणा नकळतपणे आपल्या मनात कोरला जातो …

समाज-जीवनाच्या संकेतांमध्ये अडकून रामाची होणारी घुसमट किती सुंदर व्यक्त केली आहे बघा ….
"पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती"

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणताना दैवत्व वागवणाऱ्या रामाचे एकाकीपण आणि व्याकुळता किती सुंदर रीतीने त्याच्या आसवातून व्यक्त होती आहे …

हे अद्भुत गान ऐकून राम आपले आसन सोडून उठतो आणि त्या बाळांना कवेत घेतो … याला किती सुंदर शब्दात सांगितलं आहे … "उठुन कवळिती अपुले शैशव" ! रामाने त्याचेच बाल्य जणू कवटाळले  !!… आहाहा !!!

रामायणाचे आद्यगीत म्हणून तर हे गीत लक्षात राहतेच पण त्यापेक्षा मला भावतो तो त्यातला साधा, सच्चा भावार्थ, प्रतिभेचा अप्रतिम अविष्कार आणि त्याची सुंदर सहज चाल … दुधामध्ये केशर असावं तसे शब्द आणि सूर सहजपणे मिसळून गेलेले … तरीही त्याचं स्वतंत्र अस्तित्व जपलेलं  …
 बाबुजींचा स्पष्ट तरीही भावपूर्ण स्वर (हे दोन्ही शब्द खर तर विरोधार्थी वाटतात पण एखादाच अवलिया दोन्ही गोष्टी सहजरित्या एकत्र आणू शकतो)… पेटी वर स्वतः बाबुजीच असल्याने स्वरांना शब्दांची सुरेख साथ … फक्त तबला आणि पेटी या जोरावर सुद्धा स्वरांचा स्वर्ग उभा करता येतो हे किती सहजतेने दाखवून दिल आहे या दोघांनी … शब्दांच्या सहज गेयतेवर आक्रमण न करता त्यांना चालीच्या कोंदणात बसावयाच कसब … भूप रागात उपजत असलेली भक्तिरसाची झाक आणि त्याला दिलेली किंचित नाट्याची जोड…
 आणि हे सगळ करत असताना प्रत्येक गाण्याला, त्यातल्या प्रसंगांना न्याय देत यावा म्हणून किमान ८-१० कडव्यांच काव्य … काव्य लिहून झाल्यावर त्याला चाल दिलेली असल्याने त्यातून अधिक प्रभावीपणे पुढे येणारं नाट्य … सगळंच उत्तमात उत्तम …

देव प्रसन्न वगैरे होतो आणि वर देतो हे खरंच असावं … देवाने बाबूजी आणि गदिमांना एकाच काळात जन्माला घालून वरदानच दिलंय आपल्याला … नाहीतर एका अप्रतिम अनुभूतीला आपण कायमच मुकलो असतो … 
गीतरामायणा सारख काहीतरी भव्य आपल्याला अनुभवत येतंय या साठी त्या देवाचे शत शत आभार … आणि एक विनंती, अशी माणसं बनवायचं बंद करू नकोस … भले दुसरे पुल, बाबूजी , गदिमा किंवा भीमसेन नाहीये आमच्या नशिबात, पण किमान आमच्या पुढच्या पिढ्यांना असे नवीन नवीन खजिने मिळावेत या साठी तथास्तु म्हणावेस हीच विनंती …





Tuesday, January 13, 2015

आकाशी झेप घे रे पाखरा …



बाबूजी नावाचं  एक रत्न मराठी सांगितला लाभलं … या एका गोष्टीसाठी म्हणून पुन्हा पुन्हा मराठी मातीत जन्माला यायला मी तयार आहे इतकी त्यांच्या गाण्यांची गोडी अवीट आहे …
आणि त्या रत्नांच्या खजीन्यातलं सगळ्यात अनमोल रत्नांपैकी एक म्हणजे "आकाशी झेप घे रे पाखरा"….

जगदीश खेबुडकरांचे शब्द, बाबुजींचा आवाज… त्यांनीच दिलेलं सुरेल असं संगीत …
निव्वळ तबला, पेटी आणि एक सुरेल आवाज मिळून एक सुंदर गाणं होऊ शकतं आणि ते श्रवणीयच नाही तर अविस्मरणीय ठरत … कदाचित यालाच प्रतिभा म्हणत असावेत … आणि हि देवदत्तच असावी लागते…

बाबुजींनी सावरकरांवर जीवापाड प्रेम केलं, नव्हे त्यांची भक्ती केली … आणि आज जर सावरकर जिवंत असते तर हे गाणं ऐकून आपल्या या भक्तावर बेहद्द खुश झाले असते …कर्मवाद प्रामाण्य मानणाऱ्या आणि आपले जीवन कर्मवादालाच वाहून घेणाऱ्या या गानयात्रीचे शब्द या गाण्यातून सरळ काळजाला येउन भिडतात …
एक नजर टाकली तरी लक्षात येईल कि किती मोठा संदेश, किती तळमळ हे शब्द सांगत आहेत…


आज मी आणि माझ घर यातच रमणारा जीव, त्याने या पाशातून मुक्त होऊन गगनभरारी घ्यावी … काहीतरी उत्तुंग, अचाट असे करून दाखवावे...
आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे आणि आई वडिलांच्या पुण्याईवर आयुष्य ढकलणारे यांना "स्व" जागा करण्याचे आवाहन करताना घराला कारागृहाची उपमा देणारे बाबूजी आपल्याला एका सत्याची पदोपदी जाणीव करून देतात …   तुमच्या "Comfort Zone" ला सोन्याचा पिंजरा म्हणताना त्यातून बाहेर येउन काहीतरी उत्तुंग अचाट करून दाखवा, त्यातूनच आयुष्याचा नवा अर्थ गवसेल असे सांगणारे कर्मवादी बाबूजी त्यांच्या सच्चेपणाने भावून  जातात …
आज आजू-बाजूला बघताना नोकरी आणि घर यातच रमणारे जीव , त्यांची इवली इवली स्वप्ने आणि "लिमिटेड" जगणं या कडे केविलवाण्या दृष्टीने बघणारे बाबूजी हे गाणं अक्षरशः जगले आहेत …. गाणं ऐकताना किंचित कापरा झालेला आणि भावनांनी भिजलेला स्वर याची साक्ष देत असतो …

कोल्हापूर मधून मुंबईला केवळ संगीताच्या ध्यासाने आलेले बाबूजी… मित्राच्या खोलीवर राहून जेम-तेम पैशात गुजराण करणारे आणि तरीही संगीतावरच प्रेम तसूभरही कमी न होऊ देणारे बाबूजी … गीत रामायणाच्या कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र पालथा घालणारे बाबूजी… सावरकर चित्रपटासाठी नवीन काम घेण्याच थांबवून झपाटल्या सारखे सावरकरांना वाहून घेणारे बाबूजी ….त्यांची उभी जीवनकथाच ते सांगताहेत असा भास होतो …


आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा…. ।।

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा…. ।।

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा उंबरा… ।।

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा…. ।।

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा …।।

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्‍नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा …।।

 आज आपल्या आजू बाजूला बघितले कि खेबुडकरांच्या - बाबूजींच्या द्रष्टेपणाची खात्री पटते … आपलं एवढसं विश्व तयार करून त्यात खोपटात राहिल्यासारखी लोकं बघितली कि आपली आपल्यालाच लाज वाटू लागते … नोकरी साठी पुण्यातून मुंबईला सुद्धा जायला कुरकुर करणारे मराठी बांधव, सगळे उद्योग धंदे गुजराती मारवाड्यांच्या ताब्यात गेले म्हणून गळा काढतात तेव्हा बाबूजींच्या आत्म्याला काय वाटत असेल ??

आज यशस्वी झालेल्या माणसांची नावे आठवून बघा … सचिन तेंडूलकर, अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, रजनीकांत, अमिताभ बच्चन, अंबानी … हे सगळे माझं घर, माझं घर करत बसले असते तर आज कुठे असते??

बाबुजींनी १९७४ मध्ये  दिलेला "काहीतरी करून दाखवा , स्वताची वेगळी ओळख तयार करा आणि त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा"  हा  आपल्याला सगळ्यांना आज सुद्धा तेवढाच लागू पडतो …
याला बाबुजींचा द्रष्टेपणा म्हणायचं का आपलं दुर्दैव ??